BJP : भाजपची नाशिकमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनी देखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
तसेच यावेळी मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करू नये. देवेंद्र फडणवीस हेच फक्त राजकीय विषयांवर बोलतील. प्रवक्त्यांनी वायफळ विषयांवर बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, भाजपची नाशिकमध्ये अतिशय महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे मंत्री, महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी ‘महाविजय 2024’ म्हणून संकल्प केला आहे. नाशिकच्या कार्यकारिणी बैठकीत भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भाजपने आतापासूनच दंड थोपटले आहेत.
राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांची चर्चा आहे. या निवडणुकांनंतर राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. राज्यातील महापालिकांची निवडणूक पार पडणार आहे. यामुळे भाजपची तयारी सुरू आहे.