राहुरी- गेल्या अडीच वर्षांत अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनेक चुकीची कामे मंजूर केली आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने असे प्रकार घडतात, असा आरोप माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. ग्रामविकास विभागाने बनावट कामांचा काढलेला आदेश हा भाजपचा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या षडयंत्राचा भाग असल्याचे म्हणत त्याच्या चौकशीची मागणी माजी आ. तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात तनपुरे यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजपने बोगस मतदार निर्माण केले. तसेच बनावट कामे मंजूर करून निवडणुकीवर प्रभाव टाकला. त्यामुळे बनावट कामांच्या आदेशाचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे की नाही, याचीही चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

ग्रामविकास विभागाने नगर जिल्ह्यात २ हजार ५१५ शीर्षलेखा अंतर्गत ६ कोटी ९४ लाख रुपये खर्चाची कामे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजूर केली. सहा महिन्यांनंतर, २८ मार्चला हा आदेश बनावट असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्रालयाने कळवले. दरम्यान, अनेक कामे पूर्ण करण्यात आली.
या संदर्भात माजी राज्यमंत्री तनपुरे यांनी ही मागणी केली आहे. कामांचा बनावट आदेश ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये भाजपचे आमदार, ग्रामविकास मंत्रालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या मतदारसंघातील बुऱ्हाणनगर येथील कामांचाही त्या बनावट आदेशात समावेश असल्याने विद्यमान आमदारांचाही बनावट आदेशाच्या षड्यंत्रात सहभाग असल्याचे स्पष्ट होते, असाही आरोप तनपुरे यांनी केला.
गेल्या अडीच वर्षांत भाजपने अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनेक चुकीची कामे मंजूर केली आहेत. त्यातीलच हा प्रकार आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय असे प्रकार घडतात, असा आरोपही तनपुरे यांनी केला.