मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत की आम्हीच जिंकणार, आमच्या बाजूने निर्णय लागेल. न्यायालय काय यांच्या खिशात आहे का?, असा संतप्त सवाल यावेळी संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत आज माध्यमाशी बोलत होते.
महाराष्ट्रात ज्या प्रकारे बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला हे पाहता हे सरकार लादलं आहे. त्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर करण्यात आला. त्याविरुद्ध शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने न्यायालयामध्ये गेली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? तिथेही दाबदबाव आहे याचा निकाल आज होणार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडे आज संपूर्ण देश एका आशेने पाहत आहे. यावर शेवटी जे काही निर्णय घ्यायचा तो सर्वोच्च न्यायालय घेईल. पण न्यायालय आमच्या खिशात आहे, आमच्या बाजूने निकाल लागणार, असा विश्वास काही लोकांकडून दाखवला जात असल्याने शंका निर्माण झाल्या आहेत. सर्वेच्च न्यायालय हे कोणाच्या खिशात असूत शकत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.