BJP : सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणारांची संख्या देखील जास्त आहे. 2019 मध्ये अनेक आमदारानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने देखील भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजलगाव मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल तर आगामी काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उघडपणेच हे वक्तव्य केले यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. एका पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके यांना पत्रकारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातील माझ्या मतदारांची तशी इच्छा असेल तर भाजपतही जावू शकतो, असे म्हटले आहे. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या विशिध प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी सोळंके महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे.
त्यांची जिल्ह्यात पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. असे असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना नंतर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ते म्हणाले, विनाकारण माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ही सुरू असलेली चर्चा मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे,मतदार संघाचा आमदार असल्याने मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांना भेटावेच लागते.
मला राजकीय भविष्यासाठी राजकारणामध्ये अनेक राजकीय पक्षाचे पर्याय आहेत. परंतु भारतीय जनता पक्षातील लोकांना माझी भीती वाटते, असेही ते म्हणाले. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल.