तांदुळवाडी- राहुरी मतदारसंघाचे आमदार व अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असताना, त्यांच्या अनुपस्थितीत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी येथे जनता दरबार भरवून नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत त्यांचे जागेवर निराकरण केले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
आमदार कर्डिले हे नियमितपणे जनतेशी संपर्कात राहून त्यांच्या समस्या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवत असतात. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई गाठले असताना, अक्षय कर्डिले यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची परंपरा राखत नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये सध्या अक्षय कर्डिले हे विशेष सक्रिय असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात महसूल, आरोग्य, कृषी आदी महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
त्यामुळे नागरिकांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारावेळी भाजपा प्रदेश राज्य परिषदेचे सदस्य सुभाष गायकवाड, सरचिटणीस राजेंद्र गोपाळे, सिताराम ढोकणे, भाजपा तालुका अध्यक्ष विक्रम भुजाडी, युवराज गाडे, धनंजय आढाव, अनिल आढाव, नारायण झावरे, शरद किनकर, नंदकुमार डोळस, अजित डावखर, उमेश शेळके, मयूर गवळी, नितीन ढेरे, कांतीलाल जगधने, अनिल पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.