अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सातत्याने घडत असतानाच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. अहमदनगर दक्षिणेची जागा खा. सुजय विखे यांना मिळणार नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यातच आता स्वतः खा. सुजय विखे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यानंतर मात्र या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं खा. सुजय विखे यांचचे काय आहे वक्तव्य?

नगरमध्ये रविवारी महासंस्कृतिक महोत्सव पार पडला. त्या कार्यक्रमावेळी खा. डॉ. सुजय विखे यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, आता संधी मिळाली, पुन्हा नाही मिळाली तरी काही वाटणार नाही थोडी विश्रांतीही घेतली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून भाजप लोकसभेला अहमदनगर दक्षिण जागेसाठी खांदेपालट करणार असल्याच्या चर्चाना मात्र उधाण आले आहे.
विखेंच्या साखर पेरणीला पक्षांतर्गत विरोधकांचे ग्रहण?
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. विखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत मतदारसंघात साखर पेरणी केली. त्याचबरोबर अनेकदा केलेल्या कामाचाही लेखाजोखा मांडला. त्यामुळे विखेंची तयारी पक्की मानली जात होती. भाजपतील आ. राम शिंद यांनीही लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे अनेकदा स्पष्ट केले. त्यामुळे नगरच्या जागेवरून भाजपंतर्गत रस्सीखेच असल्याचे स्पष्ट झाले.
ऐन लोकसभेच्या तोंडावर रविवारी नगर येथे विखे यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने उमेदवारीबाबत भाजपचा मुड वेगळा आहे का? या प्रश्नावर आता चर्चा रंगली आहे. खा. विखे म्हणाले, खासदारकीची संधी मिळाली, आता सात ते आठ दिवस खासदार आहे. नंतर आचारसंहिता लागू होईल, आता संधी मिळाली, नाही मिळाली तरी काही वाटणार नाही. असे म्हटल्याने शंकांना उधाण आले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे यांना संधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा घराणेशाहीवर सातत्याने टीका करतात. अहमदनगर जिल्ह्यात विखे परिवाराबाबतही हाच निकष नगरमध्ये लावल्यास, भाजपला ते परवडणारे नाही. कारण विखे यांची असलेली पकड पाहता ते नुकसानकारक ठरेल. त्यामुळे आता खा. डॉ. विखेंना पुन्हा संधी देण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना संधी मिळणार का? अशी चर्चा सध्या आहे.
लोकसभेच्या नगर दक्षिण जागेमध्ये खांदेपालट का होऊ शकते?
लोकसभेच्या नगर दक्षिण जागेमध्ये खांदेपालट का होऊ शकते? या प्रश्नावर सध्या अशा चर्चा आहेत की, राज्यात भाजपबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. आ. नीलेश लंके हे अजित दादांबरोबरच आहेत. दक्षिणेची जागा भाजपकडे असली तरी लंके यांची शिवस्वराज्य यात्रा तसेच नगरमध्ये त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करून तयारी सुरूच ठेवली आहे.
त्यामुळे लंकेंचाही या जागेवर दावा आहे. ऐनवेळी उमेदवारीसाठी आ. लंके काय खेळी करतात किंवा अजित पवार हे काही खेळी करणार का याकडेही सध्या लक्ष आहे. तसेच आ. राम शिंदे यांनी वारंवार लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनाही उमेदवारीची खात्री आहे.
काही दिवसांपूर्वीच कोरठण खंडोबा येथील कार्यक्रमात नगरमध्येही रामराज्य येणार असे सूचक वक्तव्य केल्यामुळे शिंदे यांनी श्रेष्ठींना गळ घातल्याचे लपून राहिले नाही. तसेच नुकतेच त्यांनी माझे नाव दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या यादीत असल्याचे सूचक वक्तव्यही केले होते. त्यामुळे आता नगर दक्षिण जागेसाठी खांदेपालट होईल अशी चर्चा सध्या सुरु आहे.