दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित ; तीन वर्षांत यमुना प्रदूषणमुक्त, २० लाख रोजगाराचे आश्वासन !

२७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा तिसरा व अंतिम जाहीरनामा जारी केला.याद्वारे भाजपने तीन वर्षांत यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचे, ५० हजार सरकारी पदे भरण्याचे, रोजगाराच्या २० लाख संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अमित शाह यांनी आपल्या आयुष्यात केजरीवालांसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही, अशी टीकाही केली.

दिल्ली प्रदेश भाजप कार्यालयात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा खोटारडा असा उल्लेख केला. केजरीवाल म्हणायचे की, आमचा एकही मंत्री सरकारी बंगला घेणार नाही.

मात्र, आज केजरीवालांनी स्वतःसाठी शिशमहाल बांधला आहे. रहिवासी वस्तीतील दारूची दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी मद्य परवाना वाटपात घोटाळा करून शाळा, मंदिर, गुरुद्वारांच्या बाजूलाही दारू दुकानांसाठी परवाने दिले.मोहल्ला क्लिनिकचे गाजर दाखवून दिल्लीकरांना आधुनिक हॉस्पिटलपासून वंचित ठेवले.

केजरीवाल दिल्लीकरांना आश्वासने देतात आणि नंतर केविलवाणा चेहरा करतात.केजरीवालांसारखा खोटारडा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, असे अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी केजरीवालांना यमुना नदीत स्नान करून दाखविण्याचे आव्हान दिले.तसेच आपले पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात जाऊन गंगेत स्नान करून यावे,असा खोचक सल्लाही दिला.

भाजपने या जाहीरनाम्यात गिग वर्कर्स, मजुरांसाठी १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाखांचा अपघात विमा देण्याचे आश्वासन दिले आहे. पारदर्शकपणे ५० हजार सरकारी पदे भरण्यात येतील. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या २० लाख संधी निर्माण केल्या जातील.

यमुना नदीला ३ वर्षांत प्रदूषणमुक्त केले जाईल. १७०० अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले जाईल. प्रसार माध्यमांचे कर्मचारी आणि वकिलांना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि तितक्याच रकमेचा आरोग्य व अपघात विमा देण्यात येईल, अशी आश्वासने भाजपकडून देण्यात आली आहेत. भाजप केवळ आश्वासने देत नाही तर ती पूर्णदेखील करतो, असा दावा शाह यांनी केला.

हा जाहीरनामा तयार करण्यासाठी महिला, युवक, मजूर, मध्यमवर्गीय, व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, झोपडपट्टीत राहणाऱ्या अशा सुमारे १ लाख ८ हजार लोकांशी चर्चा करण्यात आली. ६२ बैठका झाल्या आणि त्यानंतर आमचा जाहीरनामा अस्तित्वात आला,असे शाह यांनी सांगितले.

भाजपने यापूर्वी ७ जानेवारी रोजी पहिला तर २१ जानेवारीला दुसरा जाहीरनामा प्रकाशित केला होता.दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe