संगमनेरमधील गटार दुर्घटनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करा- आमदार अमोल खताळ

Published on -

संगमनेर- शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर भूमिगत गटारीच्या साफसफाईदरम्यान ठेकेदारांच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत ठामपणे मांडली.

या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. मात्र, रियाज पिंजारी याने दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबालाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी खताळ यांनी केली.

गटारीतील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध करणारा आणि पुनर्वसनासंदर्भातील २०१५ चा कायदा अस्तित्वात असतानाही या ठेकेदारांनी जाणीवपूर्वक सुरक्षेच्या नियमांना तिलांजली दिली. चेंबरमधील सांडपाणी साफसफाईचे काम यंत्राच्या साहाय्याने करणे अपेक्षित असतानाही, कोणतीही सुरक्षा साधने न देता अतुल पवार याला चेंबरमध्ये उतरवण्यात आले. चेंबरमधील विषारी वायूमुळे पवार याचा मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्यासाठी गटारात गेलेला रियाज पिंजारी यालाही प्राण गमवावा लागला.

ही घटना या दोघांच्या कुटुंबीयांसाठी अकल्पित दुःख घेऊन आली. त्यामुळे अशा दुर्घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत खताळ यांनी विधानसभेत ठोस भूमिका घेतली.

तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी अमजद बशीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, एसटीपी प्लांटचे मुख्य ठेकेदार रामहरी मोहन कातोरे, निखिल रामहरी कातोरे (दोघे रा. गोविंद नगर, संगमनेर) आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, संगमनेर) यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५, १२५ (अ), १२५ (ब), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

सुरक्षेचा अभाव आणि करारनाम्याचे उल्लंघन

ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले. त्यांनी आरोग्य विभागाची परवानगी न घेता आणि कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता मजुरांना गटारात उतरवले. त्यामुळे ठेकेदारांनी अत्यंत निष्काळजीपणा दाखविला असून कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेला पक्षाचा पदाधिकारी?

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला रामहरी कातोरे हा तालुक्यातील एका प्रमुख पक्षाचा जबाबदार पदाधिकारी असल्याचे समजते. त्याने शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे केल्याचे समजले असून त्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकरणात आरोपींना अटक होणार का याबाबत उत्सुकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!