Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफी घोटाळ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
या घोटाळ्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी केला असून, विखेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी लावून धरली आहे. हा विषय शांतपणे सोडणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे, तर लंके यांनी विखे हे शेतकऱ्यांचे “भक्षक” ठरल्याचा घणाघात केला आहे.

बोगस कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश
लोणी (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याशी संबंधित हा घोटाळा 2004 ते 2006 या कालावधीतील आहे. या कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या नावावर बेसल डोससाठी कर्ज काढून त्याची रक्कम गैरव्यवहारात वापरल्याचा आरोप आहे. तसेच, कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही बनावट कागदपत्रांद्वारे कर्जमाफी मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा दावा आहे.
कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरू विखे यांनी याप्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ आणि बँक अधिकाऱ्यांसह 54 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुमारे 9 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “तीन वर्षांपूर्वी मी हा घोटाळा उघड केला तेव्हा माझ्यावर टीका झाली. आता सर्वोच्च न्यायालयानेही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा फडणवीस काय म्हणतील? न्यायालयाचेही डोके ठिकाणावर नाही का?” असा खोचक सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे म्हटले की, राधाकृष्ण विखे पाटील यांना नैतिकतेच्या आधारावर तातडीने मंत्रिमंडळातून बाहेर काढले पाहिजे. “असे भ्रष्टाचारी नेते मंत्रिमंडळात असतील, तर स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची भाषा फडणवीसांनी बंद करावी,” असे राऊत म्हणाले. त्यांनी आरोप केला की, विखेंचा राजीनामा घेतला नाही, तर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचे पूर्ण पाठबळ आहे, हे स्पष्ट होईल. “हा घोटाळा सहकार सम्राटाने केला आहे. दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर फसवणूक झाली. मी हा विषय शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला.
नीलेश लंके यांचा आक्रमक पवित्रा
खासदार नीलेश लंके यांनीही या प्रकरणी विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची लूट करणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी लंके यांनी केली. त्यांनी विखे पाटील यांनी आपली जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, असे आवाहन केले. “मंत्री स्वतः असे घोटाळे करत असतील, तर ते शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत. त्यांचा राजीनामा घेणे हाच एकमेव पर्याय आहे,” असे लंके म्हणाले.
घोटाळ्यानंतर विखे पाटील यांच्यावरील गुन्ह्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत आणि नीलेश लंके यांनी विखेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने महायुती सरकारवर दबाव वाढला आहे.