Politics News : भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम सतत कलंक, भेदभाव आणि हिंसाचाराचे, अत्याचाराने ग्रस्त असलेले बहिष्कृत जीवन जगत आहोत आणि आपल्या स्त्रिया जगातील सर्वात अत्याचार पीडित महिला आहेत.
मात्र, भाजप- काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, त्यांना फक्त , सत्ता हवी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांच्याबाबत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर भूमिका मांडत म्हटले की, एका बाजूला जातीयवादी भाजप- आरएसएस आहे,
जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात, द्वेष पसरवण्यात, जातीयवादाचे विष पसरवण्यात आणि मृत्यूच्या ठेकेदाराचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत,
तर दुसरीकडे लाचार काँग्रेस पक्ष आहे, जो मतांच्या जोगव्यासाठी ‘मोहब्बत की दुकान’ म्हणत खुळखुळा वाजवत आहे. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी समाजातील वंचित, दलित, शोषित समाजासाठी काहीही केले नाही.
भाजप-आरएसएस आणि काँग्रेस या दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची पर्वा नाही. त्यांना सत्ता वाटून घ्यायची नाहीये, तर सर्व सत्ता फक्त आपल्याच ताब्यात ठेवायची आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
नूह हिंसाचारप्रकरणी आंबेडकरांची काँग्रेसवर टीका
हरयाणातील नूह हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे मुस्लिम आमदार मम्मन खान यांच्या अटकेविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडून काही निषेध किंवा वक्तव्ये करण्यात आली आहेत का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
माझ्या मुस्लिम बंधू- भगिनीसाठी हा चिंतनाचा विषय आहे की, जेव्हा काँग्रेस नेतृत्व स्वतः च्या मुस्लिम आमदारासाठी उभे राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही-आम्ही त्यांच्याकडून संपूर्ण मुस्लिम समाजासाठी उभे राहण्याची अपेक्षा कशी करू शकतो?
काँग्रेसला प्रेमाच्या दुकानात रस नाही, तर त्यांना फक्त ‘स्वतः चे दुकान’ उभारण्यातच रस आहे, अशी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर केली