लोकसभेसाठी ‘शिर्डी’त शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची भाऊगर्दी ! आता ‘या’ बड्या नेत्याने केला उमेदवारीवर दावा,राजकारण तापणार

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यांसुर अनेक पक्ष पक्षबांधणी,जनसंपर्क आदी कामांत गुंतले आहेत. येणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार हे नक्की. अहमदनगर जिल्ह्याची दक्षिणेची उमेदवारी जशी चर्चेत आहे.

तशीच शिर्डीत शिवसेना (ठाकरे गट) यांची स्थिती झाली आहे. येथे लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते बबन घोलप यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा केला होता. आता ज्येष्ठ नेते माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी दावा केला आहे.

 माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचा उमेदवारीवर दावा

ज्येष्ठ नेते भाऊसाहेब कांबळे म्हणाले आहेत की, मी दोन वेळा कॉंग्रेसकडून आमदार झालो तर शिवसेनेकडून एकदा विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवून पराभूत झालो आहे. असे असले तरी माझे मताधिक्य वाढले होते.

त्यामुळे आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवसेना ठाकरे गटाकडून मी आगामी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणाच जणू त्यांनी केली. कार्यकत्यांनी शिवसेनेकडून शिडीं लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्यानुसार मी उत्तरेतील सातही विधानसभा मतदारसंघात चाचपणी केली.

तेथे मला चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी परिस्थिती असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. याला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. परंतु उद्धव ठाकरे जो आदेश देतील, त्यांचे काम आम्ही करू असेही ते शेवटी म्हणाले.

शिवसेनेतूनच घरचा आहेर

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी मात्र घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेत उमेदवारी मागायची ही पद्धत नसून मी स्वतः माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते व त्यावेळी याच

लोकांनी त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्या लोकांचे पुढे काय झाले? उमेदवारी कोणाला भेटली हा इतिहास सर्वांना माहीत आहे असे ते म्हणाले आहेत. दरम्यान आता या नव्या समीकरणामुळे विविध चर्चाना उधाण आले आहे.