Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते.
यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? त्यानंतर भाजप की अन्य पर्याय निवडणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ते गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, २०१९ मध्ये पक्षाने उमेदवारीच नाकारणे यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या ज्या संचालकांची मते फुटली त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. याला जबाबदार धरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणीही घुले समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी लागल्याने घुलेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातील काहींना आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. घुले म्हणाले, मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत व पुढील निवडणुकीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात येत आहे.
तसेच या मेळाव्यात मी भुमिका स्पष्ट करणार आहे. आता बँकेतील पराभवामुळे विधान परिषदेपुढेही प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर घुले यांनी वेगळी भूमिका घेण्याचे ठरविल्याचे दिसून येते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.