संगमनेर- १९८५ साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आपण निवडून आलो. मागील ४० वर्ष राजकारणात राहिलो. पराभव हा अनपेक्षितच होता. इतकी मोठी संधी तालुक्यातील जनतेने मला दिली, १८ वर्ष मंत्रिमंडळात राहिलो. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरही मला मोठी संधी दिली. मतदार संघातही मी चांगली विकास कामे केली, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
याबाबत मुंबईत पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, पराभवानंतर संवाद सभा बोलावली. त्यावेळी १० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. पराभवाचे फार दुःख धरत बसायचे नाही. लोकांची कामे सुरूच आहेत. आजही माझ्याकडे तेवढेच लोक कामानिमित्त येत असतात. सहकारी संस्था खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यातून अधिक कामाची क्षमता वाढवता येईल.

थोरात म्हणाले की, मी काँग्रेस पक्षात टिकून आहे. कारण या पक्षाला विचारधारा आहे. पक्ष संकटात असताना अनेकजण सोडून गेले पण मी गेलो नाही. आम्ही सत्तेचा उपयोग नेहमी लोकांच्या हितासाठीच केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाची विचारधारा लोकांना समजून सांगण्यात आम्ही कमी पडलो. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिकीकरणाचा पाया घातला. आणि तो पुढील नेत्यांनी सुरू ठेवला. १९६५ रोजी जी देशाची परिस्थिती होती. ती काँग्रेस पक्षाने १९९० मध्ये बदलली. देश विविध घटकांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला.
विविध सहकारी संस्थांची उभारणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेच्या निकाल हा आश्चर्यकारक होता ही वस्तुस्थिती आहे. आज जरी पक्ष कठीण काळातून जात असला तरी भविष्यात परिवर्तन नक्की होणार आहे. राजकारण हे विचारांसाठी व तत्वांसाठी केली पाहिजे. वडील स्व. भाऊसाहेब थोरात यांनी मला राजकारणात सत्तेसाठी न जाता विचारधारेसाठी जाण्याचा सल्ला दिला. आणि तोच आपण आयुष्यभर जपला आणि पुढेही जपणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.