Maharashtra News : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कुणालाच कशाची शास्वती देता येत नाही. आता हेच पहा ना शिंदे गट शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्तेत गेला. अनेकांना मंत्री होण्याचे डोहाळे लागले. पण तितक्यात अजित पवार गट सत्त्तेत सहभागी झाला व शिंदे गटातील आमदारांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगले.
यामध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांचा देखील समावेश आहे. भरत गोगावले यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते की त्यात ते पालकमंत्री पद भेटेल असे सांगत होते. परंतु तसे काही झाली नाही.
परंतु त्यांनी अद्यापही मंत्री होण्याची अपेक्षा सोडलेली नाही. याचे कारण असे की ते नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी मी येथे मंत्रिपदासाठी नवस केला. मोहटो देवी निश्चित माझं गाऱ्हाणं ऐकेल व मला मंत्रिपदाची संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
आमदार गोगावले यांनी श्री क्षेत्र मोहटादेवी येथे जात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पाथर्डी येथे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे.
त्यात माझा निश्चितपणे सहभाग असणार आहे. यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सर्व देवतांना नवस देखील केला असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत जनतेचे मनोरंजन करतात
यावेळी आ. गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, राऊत यांना आम्ही न केलेल्या चुकीच्या गोष्टी दिसतात. पण आम्ही करत असलेली विविध विकासकामे त्यांना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे.
त्यांचे विचार पूर्णपणे नकारात्मक झालेले असून दररोज सकाळी मीडियासमोर येऊन दुसऱ्यावर टीका करतात व यामुळे सकाळी राज्यातील जनतेचे ते मनोरंजन करतात असा घणाघात त्यांनी केला.
मोहटा देवीला साकडे
मोहटा देवीची राज्यात ख्याती आहे. नवसाला पावणारी म्हणून मोहटा देवीची महती राज्यात सर्वदूर आहे. त्यामुळे मी मोहटा देवीला मंत्रिपदासाठी साकडे घातले व ते निश्चितच पूर्णत्वास जाईल व लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश होईल असा आशावाद आ. गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.