शिर्डी- शिर्डीत आता गुन्हेगारांना थारा नाही, असा ठाम निर्धार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे – शिर्डी आणि राहाता तालुक्यात स्वच्छ, सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करायचंय. त्यासाठी अतिक्रमणं हटवण्याचं काम जोरात सुरू आहे.
काही हटवली गेलीत, काही हटवली जातायत. ज्यांचं अतिक्रमण काढलंय, त्यांना जागा आणि पुनर्वसन मिळावं म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न चाललेत.

या लोकांना न्याय मिळेल, पण ज्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, छेडछाड यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना मात्र जागा देणार नाही, असं डॉ. सुजय यांनी ठणकावून सांगितलं.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, अतिक्रमण हटवलेल्यांचं पुनर्वसन करणं ही आमची जबाबदारी आहे. विखे कुटुंबाने नेहमीच दिलेला शब्द पाळलाय आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी काही कठोर पावलं उचलावी लागतायत. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयांचे चांगले परिणाम आता दिसायला लागलेत. पण साईबाबा संस्थानच्या दोन कामगारांचा बळी गेला, याची खंत वाटते.
गुंडागर्दी आणि अवैध धंदे बंद करण्यावर आमचा भर आहे. मी सगळ्याकडे बारकाईने लक्ष ठेवलंय. आता माझ्याकडे वेळही भरपूर आहे. मतदानाच्या पलीकडे जाऊन काम करायचंय, असंही ते म्हणाले.
शिर्डीच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. लवकरच एमआयडीसीमध्ये डिफेन्स प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे, ही त्यांनी दिलेली मोठी बातमी. तसंच, थीम पार्कसाठी सरकारकडून ४० कोटींचा निधी मंजूर झालाय.
साईबाबा संस्थानने ३० कोटी दिले आणि आणखी ३० कोटी जमा करून १०० कोटींच्या भव्य थीम पार्कचं स्वप्न पूर्ण करायचंय, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. यामुळे शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थकारणाला मोठा आधार मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.