Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवारांचे नाव घेतले. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमक झाले. दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
पण या प्रकरणाची चौकशी करावी. त्या चौकशीत जर मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचाच नव्हे तर राजकारणातूनही मी निवृत्त होईल. हे भाकरी मातोश्रीचा खातात आणि चाकरी राष्ट्रवादाची, शरद पवारांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात, असे म्हटले.

तसेच येत्या २६ तारखेपर्यंत त्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागितली नाही तर शिवसैनिक त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले. दरम्यान, शरद पवारांचे नाव घेतल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दादा भुसे काही आक्षेपार्ह बोलले असतील तर ते पटलावरून काढून टाकण्यात येतील, असे सांगितल्याने वाद निवळला.
यावेळी अजित पवार म्हणाले, दादा भुसेंनी जे काही मांडायचे आहे ते त्यांनी मांडावे. पण, आमचे नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. अधिवेशनात आम्ही सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र हे असे नाव घेणे चुकीचे आहे.
पवारांचे नाव घेण्याचे काहीच कारण नव्हते. भुसे यांनी आपले शब्द मागे घ्यावे, दिलगिरी व्यक्त करावी, नाही तर आम्हाला सभात्याग करावा लागेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.