Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने वेगात फिरत आहे. भाजपने अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. आता त्यांना साथ अजित पवारांची असणार आहे.
त्यातच आता अहमदनगरचा आपला बालेकिल्ला राखून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरु केलेत. शरद पवार गट अहमदनगर जिल्ह्यात ऍक्टिव्ह झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शिर्डीत होणारे राष्टवादीचे शिबीर.

परंतु त्याआधीच शरद पवार गटाचे नेते श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांना आपल्या सोबत घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. ते राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यांचे सर्मथक देखील राष्ट्रवादीच्या बैठकीत दिसले.
त्यामुळे मुरकुटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित होणार अशी चर्चा रंगली. परंतु आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा म्हणजे अफवा असून असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे खुद्द माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणले माजी आ. भानुदास मुरकुटे?
राजेंद्र फाळके व अॅड. संदीप वर्पे यांचे व माझे जुने स्नेहसंबंध आहेत. ते श्रीरामपूरला आले असता, त्यांनी केवळ स्नेहभेट दिली. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आपण ‘बीआरएस’मध्येच आपण असून, राजकीय भूमिका बदलली नाही. याबाबत ज्या बातम्या प्रसिध्द झाल्या,
त्यात तथ्य नाही. त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण मुरकुटे यांनी दिले आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यास मुरकुटे समर्थकांची हजेरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे मुरकुटे यांच्या भुमिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले असल्याने आता या विषयावर सध्या तरी पडदा पडला आहे.
काय घडल्या होत्या घडामोडी?
शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित नुकताच शरद पवार गटाचा मेळावा झाला. यावेळी फाळके व अॅड. वर्षे यांनी मुरकुटे यांच्या ‘जिद्द’ या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी आ. तनपुरे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आपण काम करावे असा निरोप असल्याचे सांगितले होते
अशी माहिती समजली होती. त्यावर मुरकुटे यांनी कार्यकत्यांशी चर्चा करुन निर्णय कळवितो, असे सांगितले होते असेही समजले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत येणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. आता स्वतः मुरकुटे यांनी स्पष्टीकरण दिले असल्याने सध्यातरी या विषयावर पडदा पडला आहे. आता शिर्डीतील शिबिरात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.