१ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेला दरमहा ३५ हजार रुपयांचा लाभ होत आहे,असा दावा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.जर भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर या मोफत सुविधा बंद होतील व जनतेचे दरमहा २५ हजारांचे नुकसान होईल,असे ते म्हणाले.
नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सरकारच्या कल्याणकारी योजना व आगामी निर्णयांवर प्रकाश टाकला.ते म्हणाले की, दिल्लीत सध्या लागू असलेल्या योजनांमुळे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबाला दरमहा २५ हजार रुपयांचा लाभ होत आहे.यात, प्रामुख्याने मोफत वीज, पाणी, बस प्रवास, शिक्षा आणि वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.
आगामी योजनांमुळे हाच निधी आणखी १० हजार रुपयांनी वाढणार आहे.मोफत विजेमुळे ४ ते ५ हजार, मोफत पाण्यामुळे दोन ते अडीच हजार,मोफत बस प्रवासाच्या रूपाने दरमहा २,५०० रुपयांची बचत होत आहे.या शिवाय शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण व मोहल्ला क्लिनिकमुळे या कुटुंबांची अतिरिक्त बचत होत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.