Maharashtra News : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्यावर राजकीय आकसातून वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा
रास्ता रोको आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा भाजप व इतर पक्षांच्या वतीने शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अरुण भाऊसाहेब मुंडे व उदय भाऊसाहेब मुंडे यांनी २३ ऑगस्ट २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पिंगेवाडी, ता. शेवगाव येथून सरकारी ४० ब्रास वाळू साठ्यांपैकी १५ ब्रास वाळू (किंमत १५ हजार रुपये) चोरून नेली, अशी फिर्याद मुंगी मंडळाचे प्रभारी मंडल अधिकारी अय्या अण्णा फुलमाळी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
यासंदर्भात पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडे यांनी गावातील सरकारी वाळू साठा चोरीस गेल्यानंतर तक्रार तहसीलदार शेवगाव यांच्याकडे केली होती व त्यावर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदारांच्या आदेशानुसार २९ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पंचनामा केला होता, त्यावेळी तहसीलने केलेल्या पंचनाम्यापेक्षा अधिक साठा आढळून आला आहे,
मुंडे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याच्या उद्देशाने त्यांच्या राजकीय विरोधकांनी सदरची खोटी फिर्याद उद्देशाने दिली आहे. सदरचा खोटा गुन्हा रद्द करून हा गुन्हा दाखल करण्यात सहभागी असलेले अधिकारी व संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर गोकुळ दौंड, तुषार वैद्य, अमोल सागडे, रिपब्लिकन पक्षाचे सतीश मगर, संजय नांगरे, विनोद मोहिते, कमलेश गांधी, अजय भारस्कर, वजीर पठाण, मानिक खेडकर, गणेश कराड, गुरुनाथ माळवदे, आत्माराम कुंडकर, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.