पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा कोणीही पालकमंत्री झाला, तरी काही फरक पडणार नाही, असे सुनील आण्णा शेळकेंनी सांगितले आहे.

सत्तासंघर्ष होत असतो, प्रत्येक व्यक्ती पक्षासाठी धडपड करत असते. सत्तेत असताना कामे झाली पाहिजेत. कार्यकर्त्यांना न्याय देता आला पाहिजे, ही पक्षातील प्रमुख मंडळींची भावना असते. मात्र मागील दोन अडीच वर्षातील राज्याचे राजकारण पाहिले असता सत्तेपेक्षा महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम कसे करता येईल. महाराष्ट्राला अधोगतीकडे कसा नेता येईल. उद्योग व्यवसाय बाहेर कसे नेता येतील याकडे त्यांचे लक्ष होते, असे म्हणत शेळकेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पारनेरचे आमदार निलेश लंके उपस्थित होते.