Dhananjay Munde : डीजे, विद्युतरोषणाई आणि पंचवीस जेसीबीमधून फुलांची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळीत स्वागत करण्यात आले. धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर आज परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
दरम्यान रोडवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. क्रेनवर एक भला मोठा हार लावण्यात आला होता. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तब्बल २५ जेसीबी उभे करून त्यातून मुंडेंवर फुलांची उधळण करण्यात आली. रात्री नऊ वाजता मुंडे कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा डीजेच्या तालावर समर्थक नाचत होते.
दरम्यान आज ते मुंबईमधून परळीत दाखल झाले. परळी शहरात मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या दुखापतीतून बरे होवून आज पहिल्यांदाच ते परळीत दाखल झाले. त्यांनी गहिनीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले.
तसेच परळीत दाखल होताच त्यांनी आपले वडिल स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. 4 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला होता.
दरम्यान, त्यांना परळीत प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती.
या अपघात त्यांच्या बरगड्या फॅक्चर झाल्या होत्या, तसेच डोक्यालाही मार लागला होता. १६ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना १९ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांना अजून काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे.