Maharashtra Politics : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली होती.
मात्र शुक्रवारी त्यांच्या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट असल्याचे पवार यांनी एकप्रकारे मान्य केले आहे.
![Maharashtra Politics](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-अजित-पवारs.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सुरू झालेला राजकीय संघर्ष आता अधिक तीव्रतेने केंद्रीय निवडणूक आयोगात जाऊन पोहोचला आहे.
शरद पवार गटाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करत अजित पवार गटाच्या ३१ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत दोन गट नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. आता ही याचिका दाखल झाल्याने त्यांनी फूट मान्य केल्याचे मानले जात आहे.
फुटीनंतर दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीवर दावा करण्यात येत आहे. अजित पवार गटाने तर यापूर्वीच राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे.
यावर आता शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करत अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळले आहेत. याशिवाय अजित पवार गटातील ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांविरोधात यापूर्वीच अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. अशा एकूण ४० जणांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल झाली आहे. यामध्ये विधान परिषदेच्या चार आमदारांचाही समावेश आहे.