Ahilyanagar Politics : कर्जत (ता. अहमदनगर) येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
“विधान परिषदेचे सभापती होणे हे मोठे भाग्य आहे, परंतु त्या पदाला काही संविधानिक शिष्टाचार असतात, ते शिंदे यांनी पाळले पाहिजेत. कोणी तरी त्यांना हे शिकवायला हवे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

शनिवारी ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान तयारीचा शुभारंभ करताना रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषद सभापतींच्या वर्तणुकीवर टीकास्त्र सोडले.
“आमदार म्हणून आम्ही राजकीय वक्तव्य करू शकतो, परंतु सभापतीपद हे संविधानिक दर्जाचे असते. त्या पदावरील व्यक्तीस कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येत नाही किंवा पक्षीय भूमिकेतून वक्तव्य करता येत नाही,” असे ते म्हणाले.
“राम शिंदे यांनी सभापतीपदाची गरिमा राखली पाहिजे. ते या पदावर पोहोचले कसे, कोणामुळे पोहोचले, त्यांनी कोणाच्या विरोधात निवडणूक लढवली आणि निकाल काय लागला, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना या पदाचा योग्य सन्मान राखता आला पाहिजे,” असेही पवार म्हणाले.
पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही मागणी करत म्हटले की, “सभापतींनी संविधानिक शिष्टाचार पाळावेत, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. जर कोणी शिकवले नाही, तर किमान नार्वेकर यांनी तरी शिंदे यांना हा शिष्टाचार शिकवावा,” असा टोला त्यांनी लगावला.