वाळकी : पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाच्या डीपीआरचा (सविस्तर प्रकल्प अहवाल) रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल सादर होणं म्हणजे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. या यशामागे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले असताना खा . निलेश लंके श्रेय लाटण्याचे राजकारण करत असल्याचे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , शहर जिल्हाअध्यक्ष अनिल मोहिते यांनी व्यक्त केले .
खा . निलेश लंके यांनी स्वतः श्रेय घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानायला हवे. संसद अधिवेशनात डॉ. विखेंनी सातत्याने हा प्रश्न मांडला, मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा परिपाक आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीमध्ये रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेऊन या प्रकल्पाची निकड मांडली होती. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या मार्गिकेच्या लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं होतं, हे विसरता कामा नये.

भालसिंग यांनी पुढे टोला लगावत म्हटलं, श्रेय लाटण्याची सवय असणाऱ्यांनी कृपया यावेळी तरी मूळ प्रयत्नकर्त्यांचा सन्मान करावा. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा मोह टाळून, वस्तुस्थिती स्वीकारावी हीच अपेक्षा असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग सांगितले .