अहमदनगर आणि नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला ८.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. मात्र नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, आता याच पाणी प्रश्नात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. शिरसाट यांच्या

या इशाऱ्याला नाशिकच्या भाजप आ. देवयानी फरांदे यांनी चोख प्रत्युत्तर देत मराठवाड्यात जायकवाडीच्या बॅकवॉटरने उसाची शेती केली जात असून, जवळपास २६ टीएमसी पाणी वापरले जात असल्याचा आरोप केला आहे.

आ. फरांदे म्हणाल्या, मराठवाड्याला पाणी द्या; परंतु मृत साठ्यामधून द्या, अशी पहिल्या दिवसापासून मागणी आहे. मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये २६ टीएमसी हा मृत्यू साठा असून, मृत साठ्यातून पाच टीएमसी पाणी जर मराठवाड्याला दिले तर नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

यावेळेस नाशिक विभागामध्ये फक्त ५२ टक्के इतका सरासरी पाऊस झालेला आहे. आताच विहिरी आटलेल्या आहेत. यावेळी पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी झालेली होती.

एकूणच पिण्याच्या पाण्याचेदेखील भीषण संकट आहे. त्यामुळे आता नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडता येणार नसल्याची भूमिका फरादे यांनी व्यक्त केली.

जायकवाडीच्या बॅकवॉटरच्या आजूबाजूला तीन तालुके असून, याच तालुक्यात अनेक साखर कारखाने असून, या कारखान्यांमधून गाळप होणाऱ्या जवळपास ४५ हजार टन साखरेचे उत्पादन घेतले जाते.

यासाठी जवळपास २६ टीएमसी पाणी लागते आणि हे पाणी अनधिकृतपणे उचलले जाते. या पाण्यामध्ये अख्खा मराठवाडा पाणी पिवू शकतो. मात्र, त्यावर कोणीही बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe