अहिल्यानगरमधील कावीळ रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्र्यांनी दिली तातडीने भेट, अधिकाऱ्यांना खडसावत तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालय न सोडण्याचे दिले आदेश

कावीळ रुग्णसंख्या २६३ वर पोहोचल्याने पालकमंत्री विखे-पाटील यांनी राजूरला भेट देत तपासणी, उपचार व जलस्रोत शुद्धीकरणाचे आदेश दिले; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) येथे कावीळ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या २६३ वर पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. ४ मे २०२५) राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

तसेच, तलाठी आणि ग्रामसेवकांना मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट आदेश दिले. सर्व पाण्याच्या स्रोतांची तातडीने तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या भेटीमुळे प्रशासनाने उपाययोजनांना गती दिली असून, कावीळ नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

विखे पाटलांनी घेतली भेट

राजूर येथील कावीळ प्रादुर्भावाने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून, दोन मृत्यूंमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी रुग्णांना धीर देताना उपचार पद्धतींची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कावीळ नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. विशेषतः दूषित पाणी हा या प्रादुर्भावाचा प्रमुख स्रोत असण्याची शक्यता असल्याने, सर्व पाण्याच्या स्रोतांची तपासणी आणि स्वच्छता मोहीम राबवण्यावर त्यांनी भर दिला.

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर विखे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, या संकटाला कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. तलाठी आणि ग्रामसेवकांना गावातच राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारी निश्चित होऊन उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने रक्त तपासणी आणि उपचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळतील आणि उपचार जलद गतीने होऊ शकतील. तसेच, डॉक्टरांची विशेष टीम पूर्णवेळ तैनात ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आमदार, जिल्हाधिकांऱ्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, साथ रोग निर्मूलन अधिकारी डॉ. नारायण वायकासे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम शेटे उपस्थित होते. या सर्वांनी कावीळ नियंत्रणासाठी समन्वयाने काम करण्याचे आश्वासन दिले. विखे-पाटील यांनी प्रशासनाला गावागावांत सर्वेक्षण करून संशयित रुग्णांची तपासणी करण्याचेही निर्देश दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News