Eknath Khadse : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची धमक त्यांच्याकडे आहे.

तसेच अनिकेत तटकरे यांच्याकडेही महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता भाजप शिंदे गटावर ते आक्रमक होणार आहेत.
खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. उत्तर महाराष्ट्रात यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळेल, यासाठी राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे आता ते सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.