Maharashtra News : लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेली लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि उन्हाच्या पाऱ्यासोबत राजकीय आखाडाही तापण्यास सुरुवात झाली. त्यात इंटरनेटच्या सोबत स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आल्याने
ग्रामीण भागातही आता आपल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चेला गावात, चौकात, पारावर व चहाच्या टपरीवर रंगत येताना दिसत आहे.
लोकसभा निवडणूक तारखा जाहीर झाल्या आणि गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघाले. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून अनेक नागरिक स्मार्टफोनच्या जवळ गेल्याने आपसूकच ग्रामीण भागही त्याच्याशी जोडला गेला.
परिणामी लोकसभा पाश्वभूमीवर होत असलेल्या प्रत्येक हालचालींची बातमी क्षणात ग्रामीण भागात पोहचत असल्याने लोकसभा निवडणुकीत कोण कोणाला शह देणार व कोणाला काटशह बसणार, यांच्या चर्चा आता गावातील पारावर, झडायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक नागरिक आप-आपल्या लोकसभा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व राहील, कोण कोणाला धोबीपछाड करील, याबाबतचे तर्क लावण्यात गुंतला आहे. त्यात राज्याच्या राजकारणात पाच वर्षात अनेक चढ-उतार, अनेकांची बंडखोरी, सत्ता,
नेत्यांची पक्षांतरे आदी बाबींचा मोठा गुंता झालेला असताना, मतदार शेवटच्या क्षणी कोणाला पसंती देतो, यांची चर्चा मात्र गावोगावी खमंग होत असल्याने मतदारांची गॅरंटी मात्र कुणाला काय असेल, याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असून निरनिराळ्या मिम्स पाहायला मिळत आहे.
एकंदरीत आता ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असली तरी जसे-जशी निवडणुकीची तारीख जवळ येईल तसे तसे चित्र स्पष्ट होणार असल्याने चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे.
सोशल मीडियात वॉर
सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. गावोगावी नेत्यांची अधिकृत अनधिकृत सोशल मीडिया फौजच जणू तयार झाली आहे. या प्रकारांमुळे जिल्ह्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहे. नेत्यांच्या अगोदर ही फौजच एकमेकांवर चालून जात आहे.