४ फेब्रुवारी २०२५ नाशिक : खरी शिवसेना कुणाची हे आता सांगण्याची गरज नाही.कारण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या मतांचा कौल पाहता खरी शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे,असे मत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.सोमवारी गोऱ्हे नाशिक दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहेत.त्यामुळे महायुतीतील कोणीही नाराज नाहीत,असे मत त्यांनी व्यक्त केले.खा. संजय राऊत यांनी शिंदे यांच्या आभार दौऱ्या विषयी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी, कोण काय बोलते, याकडे लक्ष न देता महायुती विधायक कामातून संबंधितांना उत्तर देत असून, विधानसभा निवडणुकीतून देखील हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माझ्या निवासस्थानी भेट दिली.त्यावेळी ते कोणत्याही प्रकारे नाराज असल्याचे दिसले नाही,असे गोऱ्हे यांनी सांगितले. खा. संजय राऊतांविषयी बोलताना त्यांनी, भरकटलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नये,असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.आपण सर्वजण राज्यघटनेला मानतो.
त्यामुळे राजकारणात कुणाकडून निराधार वक्तव्ये केली जात असतील, तर त्यांची दखल आपण घेता कामा नये,असा सल्लाही त्यांनी राऊतांवरून विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना माध्यमकर्मीना दिला.पालकमंत्री निवडीबाबत त्यांना विचारले असता, महायुतीतील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेण्यास सक्षम असून, ते लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महिला अत्याचाराविषयी लवकरच बैठक
महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविषयी उपाययोजना, तसेच कायद्याची ठोस अंमलबजावणी झाली पाहिजे.त्यादृष्टीने येत्या ६ तारखेला मुंबईत सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्या, तसेच संबंधित खात्याची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.महायुती सरकारच्या लोक कल्याणकारी योजना, तसेच प्रकल्प आणि निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.