संगमनेर : स्वतःला जलनायक म्हणवणाऱ्यांना संगमनेरातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवता आला नाही. उलट त्यांच्या ठेकेदारांनीच पाणीपुरवठा योजनांचा निधी खिशात घातला.
आता त्यांचा बंदोबस्त करणारच, असा इशारा देतानाच संगमनेरसह जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून तीन औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आणि त्या लवकरच सुरू होणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ग्रामस्थ आणि महायुतीच्या वतीने जलसंपदा मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड आणि नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
हा सत्कार श्री श्री १००८ जगद्गुरू परमहंस आचार्य आणि महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी विखे बोलत होते.
व्यासपीठावर भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, विनोद गायकवाड, तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, सुदाम सानप, संतोष रोहम, अशोक कानवडे, काशिनाथ पावसे, गणेश दवंगे, देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, सोमनाथ भालेराव, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अॅड. श्रीराज ढेरे, शरद गोटे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, कविता पाटील, रऊफ शेख उपस्थित होते.
विखे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील तरुणांवर अन्याय होत होता. त्यांना बदल हवा होता. तालुक्यातल्या जनतेने मोठा विश्वास दाखवत हा बदल घडवून आणला. राज्यातला सर्वात मोठा विजय आमदार खताळ आणि महायुतीला मिळाला.
यात आपल्या लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आमची तयारी आहे. पण लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोर्टात गेले.
तालुक्यातल्या महिलांचे हंडे उतरण्यासाठी जलनायकांना जमले नाही. त्यांच्या ठेकेदारांनीच पाणी योजनांचा पैसा लाटला. आता त्यांच्यावर कारवाई करणारच. साकूरच्या उपसा सिंचन योजना आणि भोजापूर चारीचे काम पूर्ण करून जिरायती भागाला पाणी देणार.”
यावेळी सोमनाथ दवंगे, रावसाहेब जाधव, आशोक गोफणे, चंद्रशेखर गडाख, सुरेश पावसे, चांगदेव गडाख, मच्छिंद्र गडाख, कैलास दिवटे, दिलीप नाना पावसे, राजू शेटे, किरण पावसे, सोमनाथ पावशे, सचिन सस्कर, भारत गोफणे, नारायण पावसे, प्रकाश पावसे, दादासाहेब गडाख, भाऊसाहेब बोराडे, कैलास गोफणे, बाबासाहेब पावसे, माधव दवंगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
उत्तम जाधव यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन काशिनाथ पावसे यांनी केले, स्वागत भाजप उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी केले, तर आभार सोमनाथ भालेराव यांनी मानले.