अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा झालेला धक्कादायक पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता.यामुळे एकीकडे माजी आमदार थोरात यांचे समर्थक कमालीचे हाताश झाले होते तर दुसरीकडे तालुक्यातील विरोधकांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यातच कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच साखर कारखान्याच्या निवडणुकीतही परिवर्तन करण्यात येईल असे वक्तव्य आमदार अमोल खताळ यांच्यासह विरोधी नेत्यांनी केले होते. यामुळे यंदाची साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची होईल असे वातावरण तयार झाले होते.

साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या वतीने सत्ता परिवर्तन पॅनलची घोषणाही करण्यात आली होती.तालुक्यातील वेगवेगळ्या गटांमध्ये विरोधकांच्या वतीने बैठका घेण्यात आल्या.या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाठबळ विरोधकांना मिळेल,अशी अपेक्षा अनेकांना होती.
मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. कारण एकमेकांचे राजकीय हाडवैर असलेले थोरात व विखे यांनी ऐनवेळी भूमिका बदलत पद्मश्री डॉ. विखे कारखाना व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांच्या आधी प्रचंड चुरशीच्या होईल असे वाटणाऱ्या निवडणुका आता बिनविरोध होण्याची औपचारिकता बाकी आहे. कारण दोन्ही कारखाना निवडणुकीतून विरोधकांनी माघार घेतली आहे.