Mula Dam : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे मुळा धरणाच्या कालव्या खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.
नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः मुळाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः कोलमडून पडणार आहे.
मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात व तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारे कायम आक्रमक भूमिका घेणारे आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि. 2 ) सकाळी 9.30 वाजता घोडेगाव चौफुला येथे मुळाचे पाणी जायकवाडीला सोडण्याविरोधात रस्ता रोकोचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आपले हक्काचे पाणी वाचवण्यासाठी नेवासा तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आ. शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात आ. शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.