Ahmednagar News : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर न होता स्थानिक परिस्थितीनुसार होत असतात. या निवडणुकीत आमच्याच दोन गटांत निवडणूक झाल्याने त्याचा फायदा काही विरोधी उमेदवारांना झाल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजय विसरून गटबाजी न करता गावाच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गुरुवारी (दि. ९) नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी संचालक नारायण जाधव होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भिटे, बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, संचालक चंद्रकांत पानसंबळ, बाळासाहेब खुळे, महेश पानसरे, मंगेश गाडे, मधुकर पवार, अंबादास डमाळे, रवी मोरे, बाबासाहेब कल्हापुरे आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार तनपुरे म्हणाले, राजकीय समीकरणे असल्याने गाव पातळीवर निर्णय झाले. ही निवडणूक पक्ष पातळीवर नसल्याने पक्षाचा संबंध नसतो. आमच्या विचाराचे सरपंच व सदस्य यांची संख्या अधिक आहे. मनात कोणतीही कटुता ठेवू नका.
सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल, यासाठी काम करावे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आणून अध्यादेशाचा अभ्यास करावा. काही ठिकाणी बहुमत आपले; पण सरपंच वेगळा अशी स्थिती झाली, त्यासाठी आता सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम सदस्यांचे आहे.
गाव पातळीवर संघर्ष करू नका. आता राज्यात सरकार नसल्याने अनेक मर्यादा आल्या. सत्ताधारी गटात गेलो असतो, तर आज कोट्यवधी रुपयांचा निधीही मिळाला असता; परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या राजकीय प्रवासात खंबीर साथ दिली,
त्यांच्यामुळेच मी घडलो आहे, त्यांनीच विधानसभेची उमेदवारी दिली व राज्यमंत्रीपदही बहाल केले होते. दीपावली सणाच्या तोंडावर पाणीपुरवठ्याचे कनेक्शन कापण्यात आले आहे. यासाठी संबंधित विभागाकडे विचारणा केली. थकबाकीमुळे पाणीपुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात आले.