Gautami Patil : सध्या डान्सर गौतमी पाटील खूपच चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. असे असताना आता मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनीच गौतमीवर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका त्यांनी केली आहे.
यामुळे आता गौतमी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, तमाशा लोककला ही चिरतरून आहे. यात केव्हाही खंडन पडणार नाही. नारायणगाव येथील राहुट्यावर गावकरी हे बुकिंगसाठी येणारच.

गौतमी पाटील वेगवेगळे हावभाव करते म्हणजे तिच्याकडे काय कला आहे? तिची बरोबरी आमच्या तमाशा कलवंतासोबत होऊच शकत नाही. तर तमाशामधील बाई चापून चोपून साडी नेसते. शेतकरी जगविण्याचं काम आणि त्याची करमणूक करण्याचे काम तमाशा कलावंत करत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी याआधी अनेकदा डान्सर गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधला आहे. गौतमी पाटील हिच्या नृत्यावर अनेकदा आक्षेप घेतला जातो. ती अश्लिल हावभाव करुन प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, असा आरोप सोशल मीडियावर केला जातो.
गौतमी पाटील हिच्याकडून याआधी अश्लिल डान्स प्रकरणी माफी देखील मागण्यात आली आहे. असे असताना तिच्या टीका करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी याआधी गौतमीवर टीका केलेली.