खुशखबर ! ‘मुळा’तील गाळ काढणार, ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार; उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाचेही काम सुरु

Published on -

महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुळा धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असून धरणावर फ्लॅपवॉल बांधण्यात येणार आहेत. यामुळे सुमारे ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत (एम. आय. पी. ) टप्पा १ मधील मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामांची दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठल लंघे,

आमदार मोनिका राजळे, आमदार हेमंत ओगले,माजी आमदार पांडूरंग अभंग,सुभाष पाटील, नामदेव ढोकणे,बाळकृष्ण बानकर,सुवर्णा बानकर, देवीदास म्हस्के,मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ,अधीक्षक अभियंता,राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी वरदान ठरणाऱ्या मुळा उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे.

वेगवेगळ्या उपक्रमातून उपलब्ध सिंचनातून अधिकाधिक क्षेत्राला प्रभावीपणे पाणी देत वितरण व्यवस्था सुधारण्यावर जलसंपदा विभागामार्फत भर देण्यात येत आहे. मुळा धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असून धरणावर फ्लॅपवॉल बांधण्यात येणार आहेत.

यामुळे सुमारे ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचेही ते म्हणाले. १५ ते ३० एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे.या उपक्रमातून गावोगावी शेतकरी, नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत.या सर्व सूचनांना एकत्रित करून सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आमदार शिवाजी कर्डीले म्हणाले, मुळा धरणातील पाण्याचा अधिक प्रमाणात पिण्यासाठी करण्यात येतो. पाईपलाईनद्वारे पाण्याच्या पुरवठा केल्यास पाणी गळती थांबून लाभधारकाना याचा मोठा लाभ होईल. मुळा धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाची उंची वाढवल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, नेवासा मतदार संघात ४५ ते ५० कोटी रुपयांची दुरुस्तीची कामे या माध्यमातून करण्यात येणार असून मतदार संघातील लाभधारकाना याचा मोठा लाभ होणार आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातही अनेक कामे मार्गी लागली असल्याचे ते म्हणाले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe