मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारामुळे नवे सरकारदेखील स्थापन झाले. मात्र अद्यापही शिवसेनेतील वाद संपताना दिसत नाही.
बंडखोरांनी ज्या चार लोकांची नावं घेतली त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांनी खडेबोल सुनावला आहेत. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.