Maharashtra Politics : कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित कारवाईची टांगती तलवार असलेल्या विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा मिळाला.
न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २२ ऑगस्टला निश्चित करताना तपास अधिकाऱ्याला तपासाच्या अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले. पोलिसांनंतर ईडीचा ससेमीरा मागे लागल्याने अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे न जाता ईडीलाच उच्च न्यायालयात खेचले आहे.
ईडीने सुरू केलेली चौकशी आणि बजावलेल्या समन्सला आव्हान देत ही बेकायदेशीर कारवाई तातडीने रोखा, ईडीने दाखल केलेला ,ईसीआयआर रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या वेळी मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. आबाद पोंडा आणि सरकारी वकील अॅड. याज्ञिक यांनी एकाच वेळी न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र तपास अधिकारी गैरहजर असल्याने न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी तपास अधिकाऱ्यांना तपासाचा प्रगत अहवाल घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले.