माननीय विखे.. आपला बाळासाहेब ! थोरातांनी सांगताच विखे धावले, प्रश्नही तात्काळ सोडवला..

Published on -

संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना आज (दि.१५) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीतून अगदी शेवटपर्यंत पोहोचले. पाणलोट क्षेत्रात पाऊस असताना धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र पाऊस अत्यंत कमी पडत आहे. पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणि म्हणून वाहून जाणारे पाणी हे उजव्या व डाव्या कालव्याने सोडण्यात यावे, त्यातून बांधारे नाला बिल्डिंग भरून घेता येतील आणि या परिसरात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे तातडीने दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी 8 जुलै 2025 रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून केली होती.

त्यांनी केलेल्या मागणीनंतर जलसंपदा विभाग व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 जुलै रोजी पाणी सोडण्याचे आश्वासित केले होते.त्यानुसार निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून 300 क्युसेस ने पाणी सोडण्यात आले असून पुढे हे पाणी वाढवण्यात येणार आहे.

सध्या संगमनेर तालुक्यासह धरणाच्या लाभक्षेत्रात क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस असल्याने निळवंडे च्या डाव्या व उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याने अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, राहुरी, सिन्नर, या तालुक्यांमधील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe