पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर गटबाजी असून, ही गटबाजी थांबली नाही तर माझ्यानंतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल, असा इशारा आ. काशिनाथ दाते यांनी दिला.
पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढावी, असे साकडे पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना आ. दाते यांनी घातले. माझ्याविरोधात वरिष्ठ नेत्यांचे कान भरण्यात येतात, चुगल्या केल्या जातात, हे योग्य नसल्याचे आ. दाते म्हणाले. त्यांचा रोख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील गौरव मंगल कलश रथयात्रेची सांगता पारनेर येथे झाली. या कार्यक्रमास अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती असल्याने आ. बाते व्यथित झाले. त्यांनी कोणाचेची नाव न घेता खडे बोल सुनावले.
या वेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, रविंद्र पाटील, युवतीच्या संध्या सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, अशोक सावंत,विक्रमसिंह कळमकर, सुषमा रावडे, भास्कर उचाळे उपस्थित होते.
आ. दाते म्हणाले की, या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत माझ्या कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या कार्यकत्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक असते. मात्र, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, त्यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला इतकी कमी गर्दी होणे हे माझ्यासाठी लांच्छणास्पद असल्याचा उद्वेग आ. दाते यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वीची परिस्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांचा लोकप्रतिनिधी शरद पवारांबरोबर गेला. मात्र, पारनेरची उमेदवारी अजित पवार यांनी हक्काने घेतली. त्यावेळी बराच खल होऊन मला संधी मिळाली.
सन २०१४ मध्ये मला उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, मला डावलले गेले. एकदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, ही संधीही हिराऊन घेतली गेली. उमेदवारीत यापूर्वी डावलल्याने यावेळी मात्र दादांनी मला संधी देऊन आमदार होण्याचा बहुमान दिला.
शेवटी का होईना अजितदादांनी न्याय दिला. मात्र, ही बाब काहींना खटकली. गटबाजी, समाज माध्यमांतून माझ्यावर टीका करून मला नामोहरण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी खंत व्यक्त करतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश पातळीवरील नेते गटबाजीची दखल घेतील, असा विश्वास आ. दाते यांनी व्यक्त केला.
समाजकारण, राजकारणात चाळीस वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर मला आमदारकीची संधी मिळाली. माझ्यानंतर नव्या पिढीला संधी आहे. नव्या पिढीचे अशा पध्दतीने वागणे चांगले नाही. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचली आहे. मात्र, आमच्यामध्ये मतभेद आहेत, हे दुर्दैवं असल्याचे दाते यांनी सांगितले.
आ. काशिनाथ दाते हे मृदू स्वभावाचे, संयमी राजकरणी म्हणून ओळखले जातात. मात्र, गटबाजीमुळे गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त असलेल्या आ. दाते यांनी कुणाचीही भीडभाड न ठेवता प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत विरोधकांना खडे बोल सुनावले. आ. दाते यांच्या रौद्र रुपाने उपस्थित कार्यकर्त अचंबित झाले.