Imtiaz Jalil : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास केंद्राने नुकतीच परवानगी दिली. या निर्णयाच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
इम्तियाज जलील हे दररोज या आंदोलनाला भेट देवून उपस्थितांचा उत्साह वाढवत होते. दरम्यान, मी दिल्लीत नामांतराचा विषय सभागृहात मांडणार आहे. हुकूमशाही पद्धतीने लादण्यात आलेले हे नामांतर, त्याला सर्वोच्च न्यायालयात कसे मांडायचे यासाठी वकिलांशी चर्चा करणार आहे.

मी दिल्लीत असतांना मला आंदोलनाचा मंडप गच्च भरलेला दिसला पाहिजे. तो रिकामा असला तर मिडियावाले मला प्रश्न विचारतील, अशी चिंता इम्तियाज जलील यांनी आंदोलनस्थळी केलेल्या भाषणातून व्यक्त केली होती. आता असेच काहीसे घडत आहे. हे सगळ्यांचे आंदोलन आहे. सगळ्यांनी साखळी उपोषणात हजेरी लावावी, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.
परंतु इम्तियाज जलील हे दिल्लीला संसदीय अधिवेशनासाठी जाताच आंदोलनाचा मंडप ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलेली भिती खरी ठरली आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी इम्तियाज यांनी अर्धा तास भाषण करत नागरिकांना भावनिक आवाहन केले होते.
दरम्यान, परंतु काल इम्तियाज जलील अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले आणि दुसऱ्याच दिवशी आंदोलनावर परिणाम झाला. दररोज गर्दीने ओसंडून वाहणारा आंदोलनाचा मंडप ओस पडला होता. बोटावर मोजण्या इतकेच लोक आंदोलनस्थळी उपस्थितीत होते.