Imtiaz Jalil : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळाला. दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर शहरातील किराडपुरा भागात मोठा राडा झाला होता. समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.
सध्या पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता परिसरात शांतता आहे. असे असताना एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी उग्र झालेल्या जमावातून मार्ग काढत राम मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. तसेच त्याठिकाणी जाऊन एक व्हिडिओ देखील बनवला आहे.
त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विडिओच्या माध्यमातून ते म्हणाले, मंदिरात मी स्वतः उभा आहे, इथे अनुचित प्रकार घडल्याच्या अफवा पसरवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा.
मी स्वतः जातीने मंदिराच्या आत उभा आहे. बाहेर काही गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. मात्र मी हात जोडून सर्व लोकांना विनंती करु इच्छितो की कृपा करुन शांतता राखा. राम मंदिरात कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही, याची काळजी मी स्वतः घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला होता. जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले तरी जमाव अधिकच हिंसक होत होता. यामुळे पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली.