Ahmednagar Politics : पारनेर नगर विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी शिक्का यांच्याकडे केली आहे . पारनेर तालुक्यात नुकताच पारनेर-नगर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे प्रभारी बिपिनभाई शिक्का यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातभाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पारनेर विधानसभेची उमेदवारी भाजपला मिळावी अशी मागणी केली.
शिक्का म्हणाले, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने जवळ प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन केले. मात्र यामुळे आता तालुक्यात भाजप देखील आक्रमक झाले असून लोकसभेत झालेल्या पराभवाचा बदल घेण्याचा पक्का निर्धार केल्याचा यातून स्पष्ट होता आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे व राष्ट्रीवादीचे (शरद पवार गट ) उमेदवार निलेश लंके यांच्यात अटीतटीच्या झालेल्या लढतीत नीलेश लंके यांचा विजय झाला.
मात्र यानंतर पारनेर तालुक्यातील विधानसभेची गणिते बदलली आहेत. लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी राणीताई लंके या सर्वाधिक दावेदार राहणार आहेत. कारण निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी आपल्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच भावी आमदार म्हणून राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
अनेक कार्यक्रमांमधून व सोशल मीडियावरही भावी आमदार, उपाधी त्यांना जोडली गेली आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लंके या विधानसभेच्या मुख्य दावेदार आहेत. या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून सुजित झावरे, काशिनाथ दाते हेच अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय निरिक्षकांमधून वर्तवली जात आहे.
तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडे आहे. यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, प्रशांत गायकवाड आदी नेते मंडळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
मात्र, डॉ. विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पारनेर मतदारसंघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत.