१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने शिवसेनेच्या २० आमदारांसह अनेक नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तत्कालीन सरकारने सेनेच्या ४४ आमदार आणि ११ खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.महायुती सरकारमध्ये यामुळे अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्याचे तीव्र पडसाद उमटले.सेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच याबाबत सवाल केला.

शिंदे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.सेनेच्या नव्हे, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची सुरक्षाही काढल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली; परंतु सुरक्षा कमी करणे हा नेत्यांवरील अन्याय असल्याचे सांगत सेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.सुरक्षा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारसीनुसार सुरक्षा कमी किंवा अधिक केली जाते, असे सांगत शंभूराज देसाई यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.