Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- भाजपच्या मंडलाध्यक्ष निवडीनंतर आता जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. शहर, उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदांसाठी मे २०२५ मध्ये निवड होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी पक्षातील इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. निष्ठा, वयाचा निकष आणि पक्षातील योगदान यावर आधारित जिल्हाध्यक्ष कोण होणार, याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५ एप्रिल २०२५) शिर्डीत सकाळी १० वाजता भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया
भाजपने शहर आणि ग्रामीण भागातील मंडलाध्यक्षांच्या निवडी पूर्ण केल्या असून, आता जिल्हाध्यक्ष निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. मे महिन्यात या निवडी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यंदा प्रथमच जिल्हाध्यक्षपदासाठी ४५ ते ५५ वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. या अटीमुळे पक्षाला योग्य उमेदवार शोधण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. इच्छुकांना वयाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे.
मंडलाध्यक्ष निवडीवरून नाराजी
मंडलाध्यक्षांच्या निवडीवरून भाजपमध्ये काही ठिकाणी नाराजी पसरली आहे. विशेषतः शहरातील काही भागांत पक्षाचे सभासद नसलेल्या व्यक्तींना मंडलाध्यक्षपद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत काहींनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली आहे. श्रीरामपूर येथे मंडलाध्यक्ष निवडीवरून वाद उफाळला असून, निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने बॅनरबाजी झाली आहे.
इच्छुकांची यादी आणि स्पर्धा
शहर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, धनंजय जाधव आणि बाबासाहेब सानप यांनी इच्छा व्यक्त केली आहे. वयाच्या निकषानुसार सुवेंद्र गांधी, महेश नामदे, प्रशांत मुथा आणि दत्ता गाडळकर हेही रिंगणात आहेत. उत्तर जिल्ह्यातून नितीन दिनकर, जालिंदर वाकचौरे आणि प्रकाश चित्ते यांची नावे चर्चेत आहेत. दक्षिण जिल्ह्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रदेश सचिव अरुण मुंढे, बाळासाहेब महाडिक आणि युवराज पोटे यांनीही दावेदारी सादर केली आहे. या इच्छुकांमधील रस्सीखेच पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला नवी दिशा देऊ शकते.
निवड प्रक्रिया
भाजपच्या बूथ प्रमुखांना प्रत्येक बूथवर १२ जणांची समिती स्थापन करणे आणि किमान ३ सक्रिय सभासद जोडणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतरच त्यांना संघटनेत पद दिले जाईल. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शहरात लक्ष्मण सावजी, दक्षिणेत मंत्री जयकुमार रावल आणि उत्तरेत माजी महापौर बाळासाहेब सानप यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्षांचे प्रयत्न
विद्यमान जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी होत आहे. शहराचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आणि दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मागील निवडणुकांमध्ये यश मिळवल्याचा दावा ते करत आहेत. मात्र, पक्ष नेतृत्व नवीन चेहरे आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या विचारात आहे, त्यामुळे या मागणीला कितपत यश मिळेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.