Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच आरोपांतून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. यामुळे ठाण्यात मोठा राडा बघायला मिळाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आहेर यांना मारहाणीचा देखील व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे ठाण्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल झाले होते.
पोलीस कार्यालयात दाखल झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील कार्यालयाबाहेर गाडीत बसले होते. पोलीस हे आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठीच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यालयात गेले. यामुळे आता जितेंद्र आव्हाड अडचणीत येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.