Kasba by-election : पुण्यात पोट निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सभा, बैठका, भेटीगाठी मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. यामध्ये देखील राजकीय बातचीत झाल्याचे सांगितले जात आहे.
कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या संदर्भात बापटांनी टिप्स दिल्या आहेत. त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. तसेच बड्या उद्योगपतींसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. उद्योगपती पुनीत बालन, उद्योगपती फत्तेचंद रांका यांचीही फडणवीस यांनी भेट घेत चर्चा केली.
गणपती मंडळांच्या अध्यक्षाबरोबर देखील त्यांनी बैठका घेतल्या आहेत. पुण्यातील सर्व मानाचे पाचही गणपती कसबा विधानसभा मतदारसंघातच येतात, यामुळे फडणवीस यांच्याकडे गेले आहेत. यामुळे फडणवीस यांनी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे समोर येत आहे.
तसेच रात्री १० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवस्थानी दाखल झाले. त्यामुळे कसबा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मास्टर प्लॅन आखत आहे, यामुळे आता निवडणूकीत रंगत वाढली आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. विरोध पक्षनेते अजित पवार हे देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी देखील सभा आणि बैठकांचा तडाखा लावला आहे.