Ahilyanagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

Published on -

अहिल्यानगर दि. ५- कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार माऊली कटके, आमदार नारायण पाटील, शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, कुकडी प्रकल्पातून लवकरात लवकर आवर्तन देण्याची कार्यवाही करण्यात यावी. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. स्थानिक लोकप्रतिनिधीकडून पाणी वितरणाच्या शिफारशी घेण्यात याव्यात. प्रत्येक तालुक्याला समानतेने पाणी वितरीत होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या ३१ मे रोजी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने जनता याठिकाणी उपस्थित राहणार आहे. चौंडीला पुरेश्या प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आवर्तनाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe