२७ जानेवारी २०२५ वडीगोद्री : गेल्या वर्षभरापासून मराठा समाज रस्त्यावर झुंजतोय,तरीही समाजाला न्याय मिळाला नाही.आता तरी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे,सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या मागण्यांशी गद्दारी करणार नाहीत,असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवार पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले की, २५ जानेवारीपासून आपण आमरण उपोषण सुरू केले आहे.२६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झाले समाज रस्त्यावर आहे.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे तत्काळ वाटप करण्यात यावे.ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली, त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे.आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत.हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे, यासह आठ- नऊ मागण्या आम्ही सरकारकडे सादर केल्या आहेत.आमच्या नवीन मागण्या नाहीत, या जुन्याच मागण्या आहेत, असे म्हणत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपल्याला लढायचे आहे.
यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे.संतोष भैय्यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत.सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत,असे म्हणत त्यांनी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.