Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे मतदार खंबीरपणे उभा राहतो,
नगर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवली असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना लगावला. नगर तालुक्यातील सोनेवाडी पिला येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी आमदार कर्डिले बोलत होते.

पुढे बोलताना कर्डिले म्हणाले नगर तालुक्यातील विरोधक उठ सूट माझ्यावरच आरोप करतात, माझ्यावर आरोप केला की त्यांना प्रसिद्धी मिळते त्यांचा टीआरपी रेट वाढतो, परंतु त्यांना विकास कामे कधीच करता आली नाहीत. निवडणुका आल्या की ते बोलतात अन्यथा मतदारसंघातही दिसत नाहीत.
माझा मतदारसंघ हा नसला तरी माझा हक्काचा तालुका आहे मी राहुरीमध्ये आमदार होतो तरीसुद्धा तालुक्याकडे दुर्लक्ष केले नाही. आता सध्या मी आशिया खंडातील एक नंबर असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे शेतकऱ्याची अनेक कर्ज प्रकरण होत आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे.
भाजप सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे येणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा भाजप पक्ष सत्तेत येणार असल्याने जे लोक बाहेर राहिले आहेत त्यांनी सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करावा आणि आपली विकास कामे करून घ्यावीत असेही शेवटी ते म्हणाले.
नगर बाजार समितीच्या निवडणुकीत सोनेवाडी गावाने सुद्धा आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अनेक वर्षानंतर मी सोनेवाडी गावात आलो आहे. त्यामुळे आता तुमची भरपूर विकासकामे होतील तुम्ही मला अशीच साथ द्या विकास कामांचा डोंगर उभा करतो. असे आश्वासन कर्डिले यांनी गावकऱ्यांना दिले.