बापलेकीला सोडा, अजित पवारांसोबत या ! तटकरेंकडून खासदारांना ऑफर

Sushant Kulkarni
Published:

९ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांशी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क करत असून, त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा आरोप फेटाळला.

यासंदर्भात तटकरे यांच्यावर आरोप करताना आव्हाड म्हणाले, एकीकडे शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष फोडायचा, अशी यांची नीती आहे.आमचा पक्ष आणि निशाणी पळवल्यानंतर आता ते आमचे खासदारही पळवू पाहात आहेत.

त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली जात आहे.पण, त्यांची ऑफर आमच्या खासदारांकडून धुडकावण्यात आली आहे. दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत.

आव्हाड यांच्या या आरोपाचे खंडन करताना तटकरे म्हणाले, मी कोणाशीही अशाप्रकारे संपर्क साधलेला नाही. २०१४ पासून २०२४ पर्यंत राष्ट्रवादीने भाजप सोबत जाण्यासाठी काय प्रयत्न केले हे योग्यवेळी सांगेन,अशा इशाराही तटकरे यांनी दिला.

दुहान यांच्याकडून संपर्क – खा. अमर काळे

काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्या सोबत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी’ अजित पवार यांच्या सोबत चला’ असा आग्रह केला होता, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही.

केवळ अमर काळेच नाहीत; तर निलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनावणे या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता. तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही, असेही काळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सुनील तटकरे यांनी आमच्या पक्षातील खासदारांशी संपर्क केला,अशी चर्चा आहे. परंतु समोरच्या बाजूने कितीही प्रयत्न झाले तरीही आमच्या पक्षाचे खासदार किंवा आमदार वेगळा निर्णय घेतील, असे वाटत नाही.- आ. रोहित पवार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe